पृष्ठे

बुधवार, १ ऑक्टोबर, २०२५

गांधीजी ...एक अद्भुत व्यक्तिमत्व !!

 "येणाऱ्या भावी पिढ्या कदाचित यावर विश्वास ठेवणार नाहीत कि एकजण असाही होता जो या मांस अन रक्ताच्या वातावरणात अहिंसेच्या मार्गावर  चालत होता."

अल्बर्ट आईन्स्टाईन



होय हे खुद्द आईन्स्टाईन ने आपल्या महात्म्याबद्दल लिहिलंय. आणि आज हे असे अचानक गांधींजींबद्दल डोक्यात यायला दोन गोष्टी आहेत. एकत्र आज गांधीजींची जयंती आहे अन अन योगायोगाने काल मी सेवाग्राम ला जाऊन आलोय.
या माणसाचे मला भयानक नवल वाटते कि एव्हढी किरकोळ शरीरयष्टी पण हट्टी पण अन स्वाभीमान  कुटून कुटून भरलेला. जॉर्ज पंचम समोरही पंचाअन धोतरावर जाऊन उभा राहिला ...चर्चिल म्हटला  सुद्धा ह्या अर्ध्या  नंग्या  फकिराला राजाने का भेटावे ? पण कीर्तीच अशी दरवळली होती कि राजाला पण ह्या माणसाला भेटावेसे वाटले. राजशिष्टाचार पहिल्यांदा तोडला गेला असेल ज्या  साम्राज्याचा सूर्य कधीही अस्त ना पावणाऱ्या त्या दरबारात . बाहेर पत्रकाराने कमी कपडे घालण्याबद्दल विचारले तर मिस्कील उत्तर आले कि राजाने आमच्या दोघांचेही कपडे घातलेलेच होते कि.
सेवाग्राम ला गेल्यावर पहिल्यांदा डोळ्यात भरतो तो तिथला साधेपणा . म्हणजे इतका साधेपणा कि चक्रावून जायला होत. आश्रमाने जशी गांधींजींच्या काळात स्थिती होती अक्षरशः तशीच राखून ठेवलीय त्या वास्तूंची.वर्धा आश्रम पूर्वी कसे असेल हा प्रश्न मला पडला कारण आजही ते शहर त्याचा साधेपणा राखून आहे. त्यावेळी तर ते अत्यंत दुर्गम असावे किंवा असेलच. अन या महात्म्याच्या पदस्पर्शाने ते पावन झालंय. अश्या या वर्ध्यात स्वतः गांधीजींचे वास्तव्य असल्याने खुद्द व्हॉइसरॉयला तिथे टेलिफोन ची सुविधा करायला लागली . त्यावेळी मी तर म्हणेन  नागपुरात कुठेतरी मोजके टेलिफोन असतील .आजही बऱ्याच ब्रिटिश इमारती वर्ध्यात दिसतात ही सगळे गांधीजींची किमया .एव्हढा हिमालयाएवढा उत्तुंग माणूस तिथे राहतो म्हटल्यावर गोऱ्यांना तिथे राहणे भाग पडले . गांधीजींना तिथे आणण्यात जमनालाल बजाज यांचाही सिंहाचा वाटा होता किंबहुना तेच यासाठी कारणीभूत होते. परंतु या गोष्टीने  वर्धा जगाच्या नकाशावर प्रसिद्ध मात्र झाले. आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्व थोर व्यक्तींचे सान्निध्य वर्ध्याला लाभले.
बऱ्याचदा मोठ्या व्यक्तीची उपदेश करणे हि एक अंगभूत सवय असते मात्र  स्वतः त्याचे पालन न करणे हेही एक सहसा आढळते .पण महात्माजी स्वतः आधी करीत अन तोच त्यांचा उपदेश असे. बघा सेवाग्राम ला गांधीजींचे  १९३६ ते १९४८ एव्हढा मोठा काळ वास्तव्य होते. अन त्यांच्या वस्तू , वास्तू अन तेथले वातावरण पाहतांना निश्चितच जाणवते कि निखळ साधेपणा तिथे असणार. पण हा साधेपणा मला हादरवून टाकतो जेव्हा कळते ह्या शेणाने सारवलेल्या ठिकाणी इंग्लंडचे भारताचे व्हॉईसरॉय लॉर्ड लिनीथागो बसून गांधीजींशी संवाद करीत बसले होते. सर स्ट्राफोर्ड क्रिप्स ने तिथेच बसून क्रिप्स कमिशन बद्दल गांधीजींशी चर्चा केली होती . आणिहि कितीकजण.. आकडा मोठा आहे . काय होत या माणसात ? लॉर्ड हॅलिफाक्स ( ब्रिटिश परराष्ट्र सचिव जो कि पूर्वी भारताचा व्हॉईसरॉय राहिला होता ) जेव्हा हिटलरला गांधीजींविषयी बोलला तर हिटलर म्हणतो गोळ्या घाला कि त्या मनुष्याला , अन डझनभर कोणी मध्ये येत असतील तर त्यांनाही गोळ्या घाला अन हे चालू ठेवा ...हसला असेल मनात  हॅलिफाक्स ...बिचार्या हिटलर काय माहिती कि मध्ये पडणारे काही डझनभर लोक नाहीत पूर्ण देशच आहे . गांधीजींनी हा विविधता असलेल्या देशाला एकजीव बनवले होते.हे सोपे नाही .
आईन्स्टाईन येणाऱ्या भावी पिढीबद्दल सांगतोय अन मला तर आताच वाटते कि हि दंतकथा आहे. काय काय प्रयोग नाही केले त्यांनी आयुष्यात. खाण्याबद्दल , आचरणाबद्दल , वनस्पती आणि औषधी आणि हो सत्याबद्दलचेही .मी तर म्हणतो एव्हढे सत्य स्वतः धर्मराजही बोलला नसेल किंवा वागला नसेल.या कलियुगात अशी व्यक्ती म्हणजे आश्चर्यच..एव्हढी स्वयंशिस्त ,अन एव्हढे मनावर अन शरीरावर करडे नियंत्रण हे सगळेच चकित करणारे.
आतापर्यंत ऐकीव असल्याने त्याच एव्हढा परिणाम झालेला नव्हता परंतु जेव्हा सेवाग्राम ला गेलो त्यावेळी मात्र गांधी नावाच्या माणसाने गारुड केले. अजून जास्त काही वाचलेले नाही पण परततांना मनाशी ठाम खूणगाठ बांधली कि जास्तीत जास्त गांधींजींविषयी  वाचन करायचे . अगदी सखोल . त्यासाठी आता लुई फिशर ने लिहिलेले त्यांचे चरित्र वाचायला घेतले आहे.
गांधीजींबद्दल एक सांगायचं मोह टाळता येत नाही कि गांधी म्हटल्यावर गुजरात आठवत नाही कारण ते पूर्ण देशाचे होते .ही माझ्या मते खूप महत्वाचे आहे.
लेख बहुदा बालिश वाटू शकेल पण उबळच  एव्हढी होती  कि तोकडे ज्ञान असतांना या माणसाविषयी  काहीतरी लिहायची उर्मी दाटून आली.
आजच्या भंपक अन उत्सवप्रिय राजकारण्यांना पाहिल्यावर तर हा माणूस अधिकच उठून दिसतो. दिल्लीत १५ ऑगस्ट १९४७ ला  स्वातंत्र्य उत्सव चालू असतांना तिथे न रमता हा माणूस नोआखली मध्ये जाऊन तिथे दंगल नियंत्रण करीत होता.आजचे राजकारणी देश जळत असला तरी तिथे स्वातंत्र्यता उत्सव साजरा करीत बसली असती अन त्याचे श्रेय लाटत बसली असती. खरे तर या अर्धवट खुज्या राजकारण्यांना या महात्म्याची कवडीची सर नाही पण यांचे थिल्लर चाळे बघितल्यावर पूर्वीचे लोक किती उत्तुंग  उंचीचे होते ही लक्षात येते अन ती खदखद कागदावर उतरवण्याचा मोह टाळता येत नाही. अन आजच्या पिढीला तर गांधीजी कळणे हि काळाची गरज आहे.गांधी हा एक विचार आहे  अन तो अमर आहे.अनेकजण होऊन गेले ,कारकीर्दही भली राहून गेली त्यांची पण जसा काळ जातो आहे त्या व्यक्ती धूसर होताहेत , कालांतराने विस्मरणातही जातील परंतु गांधीजी नाही ...असा लोकोत्तर पुरुष पुन्हा होणे नाही.
गांधींजींवर सखोल वाचन करून मी माझे विचार लवकरच मांडेन पण तूर्तास एव्हढे सांभाळून घ्या.
आजच्या त्यांच्या जयंतीनिमित्त या माहात्म्यास त्रिवार वंदन......

विवेक पगारे
नागपूर..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा