पृष्ठे

बुधवार, ९ सप्टेंबर, २०२०

सद्यस्थिती....

सध्याची भारतातली ,महाराष्ट्रातली राजकारण,सामाजिक परिस्थिती पाहता कोण्याही विचारी माणसाला नैराश्य यावे अशीच आहे.कारण चालू काय आहे अन करतो काय आहोत हा प्रश्न सध्या पडतो आहे.म्हणजे ही वरची मंडळी नेमके अशी कशी वागू शकते हे विचार करण्याच्या पलीकडे गेलेलं दिसतंय.
सुशांत,रिया प्रकरण-
सगळ्या भारतासमोरच्या सध्याच्या समस्या ह्या गौण आहेत अन फक्त सुशांत ची आत्महत्या अन रिया चे संबंध ही सध्याची सर्वात मोठी बातमी मीडिया ने लावून धरली आहे. म्हणजे अक्षरशः कहर मांडला आहे. केंद्राने हस्तक्षेप करून विनाकारण CBI ला आत आणले,डोंगर पोखरून उंदीर ही निघाला नाही तर हसे होऊ नये म्हणून त्या रिया ला बळीचा बकरा बनवण्यात येत आहे.माझा काही रिया ला पाठिंबा नाही परंतु मीडिया ने उगीचच प्रकरण इतके तापवले की रिया एक खूप मोठी खलनायिका ठरवली गेलीय.असतील चुका परंतु ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळले जात आहे ते पाहून रिया बद्दल सहानुभूती वाटते.जिवंतपणी सुशांतला एवढी सहानुभूती आणि प्रसिद्धी मिळाली असती तर तो अमली पदार्थांकडे चुकूनही गेला नसता की त्याने आत्महत्या ही केली नसती!
कंगना अन राऊत वाद-
खरे तर हा वाद च नाही पण उत्तरेकडील मंडळींनी उगीचच ताणून धरलेले प्रकरण आहे.उत्तरेकडे महाराष्ट्राबद्दल एक सूक्ष्म असूया आहे. इथला इतिहास,मुंबई,बॉलिवूड ई ई. त्यामुळे इथं थोडं काही झालं की त्याचे पडसाद तिकडे दुपटीने उमटतात.त्यामुळे सगळ्यांच्या नजरा इकडे लागतात अन त्यात जर अमराठी -मराठी वाद असेल तर त्यांना कोलीतच भेटते आयते. उदा.सुशांत , आता कंगना.
कंगना ही गुणी अभिनेत्री आहे.परंतु आजकालची तिची वाटचाल पाहता ती जरा भरकटलेली दिसतेय.सुरुवातीला ती जेव्हा बॉलिवूड बद्दल स्पष्ट बोलायची तेव्हा तिचे कौतुक होत होते.परंतु नन्तर नन्तर ती बेताल अन बोलघेवडी होत गेली.जणू प्रत्येक बॉलिवूड संबंधीत गोष्टीवर बोलण्याचा तिने मक्ताच घेतलाय. लोकांनी केलेली प्रशंसा तिच्या डोक्यात शिरली,अन दुर्दैवाने तिच्यातील एक चांगली,गुणवान अन स्पष्टवक्ती व्यक्ती हरवली अन हेकेखोर,बेताल नटीने जन्म घेतला. खरं तर अश्या प्रसंगात नेमके कुठे थांबले पाहिजे हेच खरे कौशल्य असते पण नेमके तेच ती विसरली अन वाहवत चालली.आता अश्या ठिकाणी ती पोहोचली आहे की ठरवले तरी तिला माघारी येणं मुश्किल आहे.कारण ती आता बाहुलं बनलीय,अन वरून तिचा हेकेखोर स्वभाव.त्यात अमित शहांनी गरज नसताना y+ सुरक्षा देऊन तिचा इगो अजूनच मोठा केलाय.यात पुन्हा उत्तरेकडची महाराष्ट्र असूया....
असो.महाराष्ट्र पोलीस अन मुंबई बद्दलचे जे अनुद्गार या बिनडोक नटीने काढले त्याबद्दल संजय राऊत पुढे सरसावले अन त्यांनी धिक्कार केला इथपर्यंत सारे ठीक होते. त्यांनी हरामखोर वगैरे म्हणणे हेही थोड्या फार प्रमाणात ठीक होते कारण महाराष्ट्रात असे बरेचसे शब्द ,ज्यांचे मूळ अर्थ वेगळे परंतु प्रासंगिक वेगळ्या अर्थाने वापरले जातात. जसे हरामखोर हा शब्द,याचा अर्थ वेगळा पण महाराष्ट्रात बऱ्याचदा वापरला जातो वेगळ्या अर्थाने. शाळेत शिक्षक ही उनाड विद्यार्थ्याबद्दल वापरतात तेव्हा त्यांना हरामखोरी अभिप्रेत नसते..असो राऊतांनीही चौथ्या स्तंभासमोर बोलतांना सावधगिरी बाळगली पाहिजे.त्यांच्या सारख्या नेत्यांकडून अशी चूक अपेक्षित नाही.कारण दिल्लीपती नादाचा पाद करायला बसलेलेच आहे.
मुंबई महापालिकेने एकदम कार्यक्षमता दाखवून कंगना च्या ऑफिस ची मोडतोड केली हे जरा अतीच झालं.म्हणजे तुम्हाला कोणी डिवचले तर तुम्ही खुन्नस काढाल कारण तुमच्या हाती सत्ता आहे.निदान उद्धव ठाकरेंनी हे होऊ द्यायला नको होतं.त्यांच्या प्रतिमेला तडा गेलाय या गोष्टीने. शेवटी यांचेही पाय मातीचेच निघाले.
मला एक गोष्ट पटत नाही की किती हा बालिश पणा.म्हणजे तू हे केलंस म्हणूनमी ते करीन.असे विचार लहानपनीही नव्हते आमचे.हसू येते की माणसं नुसती नावालाच मोठी होतात मात्र वागणूक तशीच राहते.
केंद्र आणि मीडिया -
आता केंद्राबद्दल. माझ्या मते सध्या देश कोणत्या घडीतून जातोय याचे केंद्रातल्या नेतृत्वाला काही सोयरे सुतक नसावे किंवा त्यांना त्या गोष्टीची उमज च नसावी.कारण आग रामेश्वरी अन बम्ब सोमेश्वरी अशी यांची गत आहे.GDP ने नीचांक गाठला आहे,आता पुढची वाटचाल भयावह आहे.सर्व तज्ज्ञांनी बेंबीच्या देठापासून ओरड लावलेली आहे पण नेतृत्व काळ झोपेत आहे किंवा त्यांना त्याची किंचितही समज नाही.मीडियाला त्यांनी दावणीला बांधले आहे,सोयीस्कर रित्या ती लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधते आहे.अक्षरशः हिणकस डाव मांडला आहे.इकडे मरायची स्थिती अन ती तुपाळ तोंडाचे लाळ घोटे अँकर जिवाच्या आकांताने आपण हे app कसे बंद केले अन त्याचा काय झटका बसला ह्याचे वर्णन करत आहे.पुढच्या अनेक वर्षात वाटचाल ही खडतर आहे,कसा त्यातून मार्ग काढावा याच्या विवेचना ऐवजी रिया ने आज काय खाल्ले असा पोरखेळ चालू आहे.आज मीडिया ने कमरेचे सोडून डोक्याला बांधले आहे.
मला विशेष वाटते ते लोकांचे,समाज असा कसा षंढ झाला आहे की त्याला काहीच समजेना.म्हणजे हा काल कोणता,कोणालाच देशाबद्दल काही वाटेनासे झाले आहे.म्हणजे वर बसलेली मंडळी खरच अशी विचारहीन झाली आहे?जर आपल्यासारख्या व्यक्तींना ही कळकळ वाटते तर वरच्या विचारी व्यक्तींची काय गत असेल? मनमोहन सिंह,रघु राम राजन यांचे काय हाल असतील? सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हेच खरे..