श्री.सखाराम रंगनाथ पगारे' ,खरं तर हे नाव तुम्हाला माहित असायला हवं असं काही विशेष नाही.हा मनुष्य असा कोणी सेलिब्रिटी किंवा कोणी प्रसिद्ध व्यक्तिमत्व नाही.पण माझ्यासाठी हे नाव खूप महत्वाचे आहे.माझ्या आयुष्याचा हा माणूस हिरो आहे. माझ्या वडिलांचे नाव हे.त्यांचं माझ्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे,किंबहुना माझ्या जडण घडणीत आणि आता पर्यंतच्या वाटचालीत त्यांचाच मोठा हात आहे.
ह्या माणसाचे शालेय शिक्षण तसे यथातथाच . साधारण ITI झालेला ,परंतु जीवनाच्या शाळेत अनेक कडू गोड अनुभव घेऊन समृद्ध असलेला माणूस. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत नेहमी हसतमुख असणारा अवलिया. या माणसाने जीवनात कोणालाही एका शब्दाने दुखावले नाही किंवा त्यांचा अट्टाहासही नव्हता कि प्रत्येकाने असं वागलं पाहिजे वगैरे.म्हणजे अगदी स्वतःच्या मुलालाही म्हणजे मला त्यांनी कधीहि असं वाग किंवा हे कर ते कर असं सांगितलं नाही.परंतु त्यांचा जबरदस्त USP (Unique Selling Point ) म्हणजे आधी स्वतः आचरणात आणणे आणि त्यावरच चालणे.हेच बहुदा राष्ट्र सेवादलाचे संस्कार असावेत.सेवा दलाच्या मुशीत ते असे तयार झालेले होते कि आम्हाला त्याचा प्रत्यय पावलोपावली यायचा.
आपले काम शांतपणे करीत राहणे ,त्याचा डंका न वाजविणे.त्यांनी त्यांच्या आयुष्यातले उमेदीची काही वर्षे सेवादलाच्या पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून अकोल्यात काढली होती.अन हे मला त्यांच्याकडून कधीच कळले नाही.मला हे कळले पुरुषोत्तम पगारे सरांकडून! मला या गोष्टीचे अजूनही नवल आहे .आजकाल कोणी किरकोळ समाजकार्य म्हणा किंवा काही काम केले तर त्याचा गवगवा च अधिक होतो.
सेवादल त्यांच्या रक्तात असे भिनले होते कि त्यांच्या सध्या वागणुकीतूनही त्याची झलक भेटायची.एक किस्सा सांगतो.मला लहानपणापासून शिवाजी महाराजांचे खूप आकर्षण.सातवीत असतांना त्यांचा एक फोटो मी घरात लावला. दादा काहीही बोलले नाही परंतु त्यांच्या कपाळावरची सूक्ष्म आठी मला खूप काही सांगून गेली.मला अजूनही ते ठळक पणे लक्षात आहे. त्यांचा कधीही या गोष्टींसाठी विरोध नव्हता.परंतु त्यांचे विचार खूप समतल होते।कोणत्याही गोष्टीचा वैचारिक अतिरेक होऊ नये असे त्यांचे वागणे. हि गोष्ट माझ्या मनावर कोरली गेली.तेव्हापासून निष्पक्षपाती विचार करण्याची सवय जडली.
सेवादलाशी त्यांची नाळ चांगलीच जुळली होती.मामा गवरेंशी त्यांचे संबंध एखाद्या मुलाप्रमाणे होते.मामा हि त्यांना मुलाप्रमाणे वागवीत.कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही कार्यक्रमात असू द्या, स्वतःहून कामात झोकून देणार.कोणत्याही कामाची लाज त्यांनी बाळगली नाही.समाजात कुटुंबात त्यांना खूप मानायचे.अत्यंत लाडके व्यक्तिमत्व.त्यांना सगळे भाऊ म्हणून हाक मारीत.सगळ्यांना त्यांचा सहवास हवाहवासा वाटायचा.कुटुंबात ते सर्वात मोठे होते अन वागणुकीने देखील मोठेच!! आदर्श!!!
मी शाळे असतांना कधीही त्यांनी कसलीच जबरदस्ती केली नाही.लहानपणापासून त्यांनी मला वैचारिक स्वातंत्र्य दिले.कधीही माझ्या निर्णयात त्यांनी आडकाठी केली नाही.दरवेळी माझ्या निर्णयाचा त्यांनी आदरच केला.म्हणजे त्यांनी प्रत्येकवेळी माझ्यावर विश्वास च दाखवला.त्यामुळे लहानपणापासून स्वाभिमान अन स्वावलंबी पण माझ्यावर जडले गेले. अमही माझे शाळेतले मित्र त्यांची आठवण काढतात .
ते जरी साधे,सरळमार्गी असले तरी भित्रे अजिबात नव्हते.एकदा कॉलेजला कसले तरी भांडण झाले अन माझे नाव त्यात गोवले गेले.माझा त्या गोष्टीशी काहीही संबंध नव्हता.दादांनी फक्त एकदा रोखून विचारले कि तुझा काही संबंध नाही ना? मी नाही म्हटल्यावर ते म्हटले मग घाबरू नको.कर नाही त्याला डर कशाला .गोष्ट पोलिसांपर्यंत गेलेली.पण दादा असे उभे राहिले माझ्यामागे कि विचारू नका! यथावकाश सर्व निवळले.मी काहीही केले नाही याची खात्री सर्वांची पटली . पण बाप हि काय चीझ असते हे दादांनी दाखवून दिले।
लहानपणी दादांनी सेवादलाची सर्व गाणी मला पाठ करायला लावलेली.त्यांचे कोणी सेवादलाचे मित्र आले कि मला म्हणायला लावीत.शिंग फुकले रणी,तुझ्या कामांमधून ,जिंकू किंवा मरू अशी कितीतरी.पाहुण्यांनी कौतुक केले कि दादांची छाती अभिमानाने फुगत असे.परंतु त्यामुळे माझ्यावरही सेवादलाचे संस्कार नकळत रुजले गेले.समतल विचार, साधेपणा ,एक कळली विचारसरणी नको इ इ.
उतारवयातही कोणावर आपला भार नको असे त्यांचे वागणे.स्वावलंबी पण हा मोठाच गुण होता त्यांच्याकडे. कधीही ते कुणाशी चुकूनही तुसडे वागले नाही.त्यांचे जुने मित्र भेटल्यावर त्यांची काली खुलत असे.सरांच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी ( नम्रताच्या) जेव्हा सगळे सेवादलाचे जुने स्नेही भेटले तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेना. अन विशेष म्हणजे माझे बरेचसे मित्र हे त्यांचे जवळचे मित्र होते.
असे माझे दादा.अजुनाही खूप त्यांच्याबद्दल सांगण्यासारखे आहे परंतु लेखनसीमा.
गवारे मामा जन्म शताब्दीच्या अनुषंगाने पगारे सरांनी मला दादांबद्दल लिहायला हे व्यासपीठ दिले त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहील.
जय हिंद...
विवेक पगारे
नवी दिल्ली
७८३५०६९०९०